10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश
(The Failure of the Women to Win the Prince)
*********************

1) उदयीनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या ह्रदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला.

2) तथापि त्यांच्या कटी, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजुक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असुन सुध्दा त्या अंतःपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करु शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती.

3) परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता आणि प्रेम यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला.

4) नंतर त्या स्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीणींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या.

5) स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात, सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजउद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता.

6) त्यांच्यापैकी काही जणींनी सहज लागलेल्या धक्यात त्याला आलिंगन देऊन धरले.

7) तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करुन त्याला आलिंगन दिले व आपले वेलीसारखे सुंदर हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडले.

8 ) तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या, "माझं गुपित ऐकावं बर का."

11) काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवित इकडे तिकडे फिरत होत्या.

13) कमलांच्या ताटव्यातुन आणलेली कमलषुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्यादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्राशेजारी उभी होती.

14) दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणु काय म्हणत होती, "तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज."

17) दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करुन त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या.

19) दुसरी एक पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, "स्रीकडून जिंकला गेलेला तू, आता जा आणि ही पृथ्वी जिंकून घे."

20) दुसरी एक चंचलनयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दांत राजपुत्राला उद्देशून म्हणाली,

21) "नाथ, मधु सुगंधी मोहोराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करुन ठेवल्याप्रमाणे कोकिळा गात आहे."

22) "इकडे या आणि अशोकवृक्ष पहा. प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर गुंजारव करीत आहेत."

24) "हा फुललेला कुरवक पहा. रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे."

25) "या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा. जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे."

26) "ज्यांच्या काठावर सभोवार सिंदुवरा चे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व तलम वस्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे."

27) "स्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे."

28) "आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरालाप ऐका. दुसरा कोकिळ पक्षी जणू काय त्याला निर्भरपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते."

29) "वसंत ऋतूंत पक्ष्यात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुध्दिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या विचारवंताचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते."

30) अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या तरुणींनी प्रेमयुध्दाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला.

31) तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही.

32) त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करु लागला.

33) "या स्त्रियांत अशा कोणत्या गोंष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे? कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे."

34) अशा प्रकारे ह्या स्तुतीसुमनांचा वर्षाव अनेक महीने व वर्षे सारखा चालला होता. परंतु तो सफल झाला नाही. 


☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: ११. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत
*********************



Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to Pinterest

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म