11. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
11. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत
(The Prime Minister's Admonition to the Prince)
*********************

1) त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले.

2) राजनीतीत कुशल व धोरणी असलेल्या उदयीनाने अखेर स्वतःच राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले.

3) राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, "तुझा एक अनुरुप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली, त्याअर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे," असे बोलून उदयीनाने सुरवात केली.

4) "जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे हीे मित्राची तीन लक्षणे आहेत."

5) "मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही, तू पुरुषार्थापासून दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल."

6) "कपटानेसुध्दा स्रीची मनधरणी करणे हे योग्यच आहे. त्यामुळे लज्जाही जाते व रंजनही होते."

7) "आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्रीचे ह्रदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. आणि स्रीला आदरभाव आवडतो."

8 ) "मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार?"

9) "विनय(courtesy) हा स्रियांना सुंगधी उटण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनयावाचून सौंदर्य हे पुष्पविहिन उद्यानासारखे आहे."

10) "पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर ह्रदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे सुखोपभोग तुझ्या मुठीत आहेत. मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा?"

11) "ऐहिक सुखे हाच सर्वप्रथम पुरूषार्थ मानून प्राचीन काळी (पुरंदरा)इंद्राने गौतम ऋषीची पत्नी आहिल्या हिचे प्रियाराधन केले"

12) "अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीनेसुध्दा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याकडे प्रेमयाचना केली आणि श्रुती सांगतात की, लोपामुद्रेचीही तीच गत झाली."

13) "महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मारुताची कन्या ममता हिच्यासोबत भारद्वाजाला जन्म दिला."

14) "श्रेष्ठ दाता अशा चंद्राने वृहस्पतीच्या पत्नीस ती अर्ध्य प्रदान करीत असताना सोबत करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला."

15) "अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीनेसुध्दा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी काली हिच्याशी सहवास केला."

17) "आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असतानाही राजर्षी ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला."

19) "यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय असूनही कामोपभोगाचा अवलंब केला. तर जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल?"

20) "आणि असे असताना तुझ्यासारखा शक्ती व सौंदर्यसंपन्न युवक; ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करीत आहे!"


☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १२. राजपुत्राचे महामंत्र्यांस उत्तर
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म