1. मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************
1. मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप
Charge of Conversion by Glamour
*************************

1) एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये तथागत बुद्ध वास्तव्यास होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे आला आणि म्हणाला, "तथागत, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादुगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादुटोणा त्यांना अवगत आहे."

2) "जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्याचा हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवी लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही. पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे, त्याबद्दल ऐकण्याची आमची इच्छा आहे."

3) तथागत म्हणाले, "भद्दीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करु नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरुपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारु नका. तुम्हाला ती न्याय्य वाटते, म्हणून ती मान्य करु नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारुन जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारु नका."

4) "पण भद्दीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते अयोग्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले, तर त्याचा तुम्ही त्याग करा."

5) "आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे, भद्दीय, जे मजवर जादुटोणा करुन धर्मपरिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय?" भद्दीय बोलला, "होय, तथागत, ते महत्वाकांक्षी आहेत."

6) "आणि भद्दीय, जेव्हा कुविचार आणि सूडभावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय?"
"होय, तथागत, देतील." भद्दीय बोलले.

8). "भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, 'प्रिय शिष्या, लोभयुक्त विचारांचे नियमन करुन तू राहात जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रिण ठेवून तू वाग."

9) "भद्दीय, जे श्रमण ब्राम्हण माझी निंदा करतात की, श्रमण गौतम जादूगर आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे. ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भूलवतो; ते लबाड व खोटे बोलणारे आहेत."

10) "तथागत, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. तथागत, जर सर्व ब्राम्हण, वैश्य आणि शुद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालपर्यत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल."

11) "खरे आहे. भद्दीय, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म