1. बुद्धांना दारिद्र्य नापसंत होते

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग तिसरा - तथागतांची आवड व नावड
Part III- His Likes and Dislikes
*************************
1. बुद्धांना दारिद्र्य नापसंत होते
His Dislike of Poverty
*************************

1) एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात राहात होते. त्या वेळी गृहस्थ उपासक अनाथपिण्डिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की, "मानवाने धनार्जन कां करावे?"

2) "तू मला विचारतोस म्हणून तुला मी सांगतो."

3) "ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे; तसेच ज्याने न्याय्य मार्गाने धन कमावले आहे अशा एखाद्या अरियन अनुयायाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापित्यांना सुखी व आनंदी करतो, आणि त्यांना नेहमी तसे आनंदी ठेवतो; त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार ह्यांनाही. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे."

4) "अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेह्यासोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसेच सुखी आणि आनंदी राखतो (टिकवून ठेवतो). हे दुसरे कारण आहे."

5) "अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू."

6) "अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो पाच प्रकारचे दान अर्पण करू शकतो. स्वतःचे कूळ, अतिथि, पितृ, राजा, व देव असे पाच मार्गाने दातृत्व करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू."

7) "अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे, स्वर्गीय सुखाप्रत नेणारे असे दान 'अहंकार व आळस ह्यांपासून मुक्त असलेल्या, सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत व परीपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना' देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू."

8). अनाथपिण्डिकाला समजले की, तथागतांनी गरिबीचा गौरव करून गरीबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरीबीला श्रेष्ठत्वही दिले नाही.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म