1. बिंबीसार राजाचे दान

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचे समर्थक
Part I- His Benefactors
*************************
1. बिंबीसार राजाचे दान
Gift from King Bimbisara
*************************

1) बिंबीसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता; तर तो त्यांचा परम भक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता.

2) उपासक झाल्यावर बिंबीसाराने विचारले. "भिक्खूसंघासह तथागत उद्या माझ्याकडे भोजन घेण्यास संमती देतील काय?"

3) तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली.

4) आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबीसार राजा आपल्या आसनावरुन उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालून तो निघाला.

5) रात्र संपताच बिबीसाराने सर्वोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, "तथागत वेळ झाली आहे. भोजन तयार आहे."

6) तथागतांनी दोन प्रहर होण्यापुर्वी चीवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटिल भिक्खूंसमवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला.

7) तथागत बिबींसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूंसह ते बसले. बिबींसार राजाने पंक्तीच्या प्रमुखस्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गाला स्वतःच्या हातांनी भोजन वाढले. आणि तथागतांनी भोजन केल्यावर आपले भिक्षापात्र धुऊन स्वच्छ करताच बिबींसार राजा त्यांच्याजवळ बसला.

8). त्यांच्याजवळ बसल्यावर बिबींसार राजा विचार करु लागला. "तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी? गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणारया लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांत. रात्री जनसंमर्दापासून दूर एकांतात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी."

9) बिबींसार राजाला मग आठवले, "माझे वेळूवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही. शिवाय येण्याजाण्यास सोयीस्कर. बुद्ध ज्या संघाचे प्रमुख आहेत, अशा या भिक्खू संघास मी ह्या वेळूवन उद्द्यानाचे दान केले तर?"

10) मग बुद्धांच्या हातावर पाणी सोडण्यासाठी बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेतले व तथागत बुद्धांना दान देताना तो म्हणाला, "आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खूसंघास माझे वेळूवन उद्यान मी दान देत आहे." तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला.

11) तथागतांनी नंतर उत्साहित, उत्सुक आणि आनंदित अशा बिंबीसार राजाला प्रवचनातून धम्म शिकवण दिली व आपल्या स्थानावरुन उठून ते निघून गेले.

12) या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, "भिक्खूंहो, ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म