2. सुनीत नावाच्या स्वच्छताकर्मीस धम्मदीक्षा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सहावा- कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा
Conversion of the Low and the Lowly
*************************
2. सुनीत नावाच्या स्वच्छताकर्मीस धम्मदीक्षा
Conversion of Sunita, the Sweeper
*************************

1) राजगृहात *सुनीत* नावाचा एक स्वच्छताकर्मी राहत होता (scavenger). लोकांनी रस्यावर टाकलेला केरकचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता.

2) एके दिवशी पहाटे भगवन्त उठले, त्यांनी चीवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले.

3) यावेळी सुनीत रस्ता झाडीत, कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता.

4) आणि ज्या वेळी त्याने तथागतांना आणि त्यांच्यामागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्या वेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. तसेच त्याला आदरयुक्त भीतीही वाटली.

5) लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवन्तांना नमस्कार केला.

6) त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या अतिशय मधुर वाणीने (in divinely sweet voice) त्याला म्हणाले, "सुनीत, असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का?"

7) आणि अमृतवर्षावाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला, "या जीवनात तथागतांसारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये! तथागतांनी मला कृपा करून संघात सामील करुन घ्यावे."

8) तेव्हा तथागत म्हणाले, *"भिक्खू, ये!"* आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चीवर आणि भिक्षापात्र देण्यात आले.

9) तथागतांनी त्याला विहारात नेऊन *धम्म आणि विनय* (Dhamma and the Discipline) यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले, *"शील, शिस्त, संयम आणि स्वतःवर संपूर्ण नियंत्रण यांमुळे मनुष्य पवित्र होतो"*
("By the discipline of holy life, restraint and mastery of self, a man becomes holy.")

10) सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले,"राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या ह्या क्षुद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात बुद्धाचा पुत्र मात्र स्वयंतेजाने प्रकाशमान होतो."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म