2. निब्बाणाचा पाया आणि मूलतत्त्वे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
IV (चार)- बुद्धांची निब्बाणावरील प्रवचने
SECTION FOUR-- Sermons on Nibbana
*************************
2. निब्बाणाचा पाया आणि मूलतत्त्वे
The Roots of Nibbana
***********************
( *2.i* )
1) एकदा आदरणीय राध हा तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून तथागतांना त्याने प्रश्न केला. *"भगवन, निब्बाण म्हणजे काय?"*
2) *"निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती."*
Nibbana means release from passion.
3) "तथागत, परंतु *निब्बाणाचे ध्येय (उद्देश्य, aim) काय?*"
4) "निब्बाणस्थितीत राहून नीतिमान जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय."
Rooted in Nibbana, Radha, the righteous life is lived. Nibbana is its goal. Nibbana is its end.
( *2.ii* )
1) एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिण्डकाच्या जेतवनात वस्ती करीत होते, त्या वेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, "बंधूंनो,"
2) "नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हांस सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय?" (The Five Fetters that bind to the lower world.)
3) यावर स्थविर मालुंक्यपुत्त तथागतांस म्हणाला,
4) "तथागत, ती पाच बंधने मला माहीत आहेत."
5) "मालुंक्यपुत्ता, ती कोणती ते सांग."
6) "भगवंत, *'हे शरीर मी आहे' ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद, आणि दुष्ट बुद्धी,* ही भगवंतानी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत; आणि ही पाच बंधने भगवान, मला माहित आहेत."
7) "मालुंक्यपुत्ता, कोणत्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढीलप्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय?"
8). "मालुंक्यपुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी *शारीरिक जाणीव* कशी निर्माण होईल?"
9) "त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध बालकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी *मानसिक अस्थिरतेची अवस्था* कशी उद्भवणार? हे खरे की, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते."
10) "मालुंक्यपुत्ता, त्याप्रमाणेच ते बालक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची *नैतिक सदोषता* कशी असणार? तरीसुद्धा त्याच्या
ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते."
11) "मालुंक्यपुत्ता, त्या बालकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात. मग ऐंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते."
12) "शेवटी, हे मालुंक्यपुत्ता, त्या बालकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणिमात्रांसंबंधी आपल्या मनात *दुष्ट बुद्धी* कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते."
13) "मालुंक्यपुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान बालकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय?"
14) तथागतांचे हे भाषण संपताच पूजनीय आनंद त्यांना म्हणाला, "भगवंत, सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे."
Comments
Post a Comment