3. पती आणि पत्नी
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
एक- गृहस्थांसाठी प्रवचने
SECTION ONE-- Sermons for Householders
*************************
3. पती आणि पत्नी
*************************
1) एकदा तथागत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या.
2) तेव्हा तथागतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले.
3) ते सर्व तथागताजवळ आले. त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, "पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणते? यावर तथागतांनी त्यांना उत्तर दिले."
4) "हे गृहस्थहो, पती पत्नी चार प्रकारे एकत्र राहतात. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल; दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल; सतपुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सतपुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल."
5) "गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत-भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सतपुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्यांच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही त्यासारखेच असते, अशा प्रकारे सहगृहस्थ हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो."
6) "गृहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पतीचे वर सांगितल्याप्रमाणे वर्तन असते, परंतु पत्नी हत्या, चोरी व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सदगुणी आणि हितकार असते, अंतःकरण मोहाधीन नसते, ती आपल्या कौटुंबिक जीवनात सदगुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो."
7) "गृहस्थहो, सज्जन, देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते: या जीवनात पती हत्या, चोरी व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असतो, त्याची वागणूक गुणयुक्त व हितकारक असते, मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सदगुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते."
8). "गृहस्थहो, चौथ्या प्रकारचे पती पत्नी जीवनात जणू काही देव देवतेबरोबर राहत आहे अशी वागतात. कारण ते दोघेही पती-पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य भाषण व्याभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत."
9) "गृहस्थहो, पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत."
Comments
Post a Comment