3. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग चवथा- भिक्खू आणि सामान्य उपासक
Part IV- The Bhikkhu and the Laity
*************************
3. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म
The Dhamma of the Bhikkhu and the Dhamma of the Upasaka
*************************
1) बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्धधर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात.
2) अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचेच असेल, तर ते असे की, बौद्ध धम्म हाच खराखुरा धर्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपली धर्माची व्याख्या सुधारली पाहिजे.
But if any reply is to be given, it is that Buddhism is the only real religion and those who do not accept this must revise their definition of religion.
3) दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात बौद्धधर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्धधम्माने सामान्य माणसाला आपल्या कक्षेबाहेर ठेवले आहे.
4) भगवान बुद्धांच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की, त्यामुळे बौद्धधम्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय, या टीकेला बळकटी येते.
5) म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे.
6) *भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय?* किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही, अशी वस्तुस्थिती आहे काय?
7) भगवान बुद्धांनी आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धांनी जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे.
8). *पंचशील, अष्टांगमार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते,* ही त्यांच्या स्वरुपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे; आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरूरी नाही.
9) *"ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत.* गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत."
10) तथागत बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो उपदेश प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे.
11) तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे.
12) त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे.
13) एकदा भगवान *श्रावस्ती* येथील *अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात* राहात असता *धम्मिक आणि इतर 500 उपासक* त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर
धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि तथागतांना उद्देशून म्हणाला,
14) *"तथागत, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता?"*
15) "इथे भिक्खूंसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या."
16) तथागत म्हणाले, "ऐका, भिक्खू हो, कान देऊन ऐका, आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा."
17) "दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो."
18) "अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका."
19) "भिक्षा मिळताक्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य गोष्टींमागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा."
20) "धर्मशील लोकांशी बोलताना, हे भिक्खूहो, भाषणाचा विषय *धम्म* हाच असू द्या."
21) "भिक्षा, आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत; यापेक्षा त्यांना अधिक महत्व नाही असे माना."
22) "ह्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील."
23) *"आता उपासकांना प्रगतिपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो."*
24) "हत्या करू नका. मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकल प्राणिमात्रावर प्रेम करा."
25) "कोणीही उपासकाने मुद्दामहून चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे."
26) "उपभोग ही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रम्हचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका."
27) "राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका, किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा."
28) "मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा."
29) "मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा."
30) "हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यांपासून परावृत्त व्हा."
31) "सप्ताहामागून सप्ताह, उपोसथाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने अष्टशीलांचे पालन करा."
"So make thy sabbath vows as week succeeds week, and keep with pious hearts this eight-fold festival."
32) "प्रातःकाळी पवित्र, श्रद्धायुक्त व कृतज्ञतापूर्वक चित्ताने वरील उपोसथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या."
"At morn, these vows performed, with pious, thankful heart, be wise; and of thy means give almsmen food and drink."
33) "आपल्या आईवडिलांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा."
34) "असा एकनिष्ठ उपासक उच्च प्रतीच्या, प्रकाशित अशा जगात प्रवेश करील."
35) ह्यावरून स्पष्ट होईल की, धम्म हा दोघांना समान आहे.
36) परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे.
37) *भिक्खूंना पाच व्रते अनिवार्य आहेत.*
38) आपण हत्या करणार नाही, असे व्रत त्याला धारण करावे लागते.
39) दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
40) कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
41) स्त्रीसुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते.
42) उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
43) हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत.
44) फरक आहे तो एवढाच की, भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वच्छेने करावयाचे असते.
45) *ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत:*
46) भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते.
47) भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते.
48) भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे.
49) *तथापि, धम्म हा दोघांनाही समान आहे.*
*भाग चवथा समाप्त*
Comments
Post a Comment