3. त्यांचे नेतृत्व-सामर्थ्य

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग पहिला - त्यांचे व्यक्तीमत्त्व
Part I- His Personality
*************************
3. त्यांचे नेतृत्व-सामर्थ्य
*************************

1. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. *संघ ही एक स्वायत्त संस्था होती.* (self governing body)

2. तर मग संघ आणि त्याचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते?

3. ह्याबाबत तथागतांचे समकालीन *सकलुदायी व उदाई* ह्यांची साक्ष उपलब्ध आहे.

4. एकदा भगवान *राजगृहातल्या वेळूवनात* वास्तव्यास होते.

5. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी तथागत राजगृहात गेले; पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणवून परिव्राजकारामात *सकलुदायीकडे* जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले.

6. त्या वेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकलुदायी बसलेला होता. अस्तित्व व नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती.

7. दुरून तथागत येत असल्याचे सकलुदायीला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली, "गप्प रहा! गडबड करु नका. *शांतताप्रिय श्रमण गौतम येत आहेत!"*

8. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात तथागत आले. त्यांना सकुलदायी म्हणाला, "या, या भगवान! आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवंतांनी आसनस्थ व्हावे."

9. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले ह्याची त्यांनी चौकशी केली.

10. त्यावर सकलुदायी बोलला, "जाऊ द्या. काही विशेष नाही. तुम्हाला पुढे कधी तरी सहज समजेल ते!"

11. काही दिवसांपूर्वी जेव्हा विविध मतांचे श्रमण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की, *"अंगदेशातील मगध परिजन किती भाग्यवान आहेत की, जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके जनसंमर्दाने आदरणीय मानले आहेत ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत."*

12. "त्यामध्ये पूर्णकाश्यप आहे. मख्खली गोशाल आहे. अजित केशकम्बल आहे. संजय वेलठ्ठिपुत्र आहे, निगंठनाथपुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. *त्यात श्रमण गौतमसुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात गुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत."*

13. "ह्या अधिपतींपैकी, ह्या सुविख्यात श्रमण ब्राम्हण आचार्यांपैकी असा कोण आहे की, जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्मान्य वाटतो? आणि ते आपल्या गुरूपाशी किती पूज्यबुद्धीने आणि आदराने राहात होते?"

14. काही म्हणाले, "पूर्णकाश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवीत नाहीत. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही."

15. अशी वेळ एकदा आली होती. जेव्हा पूर्णकाश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, "पूर्णकाश्यपांना काही विचारू नका. त्यांना ह्या विषयात काही समजत नाही. मला विचारा. मी आपणास सर्व काही समजावून देऊ शकेन."

16. तेव्हा पूर्णकाश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, "आपण शांत रहा. गडबड करू नका!"


*************************
*भाग पहिला समाप्त*
*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म