3.(ii). रुग्णांबद्दल चिंता (ii)

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग दुसरा - तथागतांची मानवता
Part II- His Humanity
*************************
3.(ii). रुग्णांबद्दल चिंता (ii)
His Concern for the Sick
*************************
*(3.ii)*

1). एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहात होते.

2). त्या वेळी स्थविर वक्कली रुग्ण, पीड़ीत व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता.

3). स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला, "मित्रहो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरनी वंदन करून त्यांना सांगा, 'भिक्खू वक्कली रुग्ण, पीडीत व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे.' आणि असेही सांगा, 'वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या.'"

4). भगवानांनी मौनानेच सम्मती दर्शवली. नंतर वस्त्रे लेवून भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले.

5). स्थविर वक्कलिने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछान्यावर तो सावरून बसला.

6). तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, "वक्कली, उठू नकोस. ह्या इथल्या आसनावर मी बसतो." त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले:

7). "वक्कली, मला दिसते आहे की, तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची?"

8). "नाही, भगवान. मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. उलट वाढण्याचीच दिसतात."

9). "तुझ्या मनात काही संदेह आहे, वक्कली? काही दुःख?"

10). "भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही."

11). "वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोशार्ह आहे काय?"

12). "भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही."

13). "वक्कली, असे आहे तर तुला काही तरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे."

14). "भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते."

15). "वक्कली, ह्या माझ्या क्षुद्र देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला (Norm) पाहतो, तो मला पाहतो, वक्कली! जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म