5. सदाचरणाच्या मार्गावर चालण्यासाठी सहप्रवाशाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
III (तीन)- बुद्धांची सदाचरणावरील प्रवचने
SECTION THREE-- Sermons on Righteousness
*************************
5. सदाचरणाच्या मार्गावर चालण्यासाठी सहप्रवाशाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही
One Need Not Wait for a Companion to Tread on the Path of Righteousness
***********************
1) "रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत."
2) "हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय."
3) "शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात; परंतु या सर्वांहून आत्मसंयमी मनुष्य श्रेष्ठ होय."
4) "अश्व, गज ही सर्व वाहने, आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते."
5) "अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारांवर अविश्रान्तपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा."
6) "सदवर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धीमान असा सहप्रवासी तुम्हांला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून, आनंदाने त्याच्या मागून चालू लागा."
7) "सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हांला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात रहा."
8). "एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच रहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच रहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा."
9) "कुविचार मनातून उखडून टाका."
10) "ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे:"
11) *"जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करुन कुविचार उखडून टाका."*
12) *"जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही."*
13) *"जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही."*
14) *"जरी दुसरे पवित्र जीवन आचरण करीत नसले तरी मी ते आचरणारच."*
15) *"जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही."*
16) *"जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही."*
17) *"जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगीन."*
18) *"जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली* तरी तुम्ही मात्र *सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्म, सम्यक् उपजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी या अष्टांग मार्गांचा अवलंब करा."*
19) "जरी दुसरे अरिय सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
20) *"जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे."*
21) "जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे."*
22) *"जरी दुसरे शंकानी पछाडलेले असले तरी तुम्ही निःशंक राहिले पाहिजे."*
23) *"जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बूजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतीहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे."*
Section III Completed
Comments
Post a Comment