5. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
*************************
5. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही
Belief in Soul is not Dhamma
************************
*(१)*

1) ब्राम्हणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता.

2) काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत. काहींना नैमित्तिक.

3) नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो, ते करणे आवश्यक होते.

4) नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात.

5) ब्राम्हणी यज्ञात सुरापान, पशूबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे.

6) तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात.

7) अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला तथागतांनी मान्यता दिली नाही.

8). जे अनेक ब्राम्हण भगवान बुद्धांजवळ 'यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे,' या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत.

9) असे लिहिलेले आहे की, तीन ब्राम्हणांनी त्यांच्याशी वाद केला.

10) ते तीन ब्राम्हण म्हणजे– कूटदंत, उज्जय आणि उदायी.

11) कूटदंत ब्राम्हणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली.

12) तथागत बोलले, "ठीक आहे, ब्राम्हणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक."

13) कूटदंत उतरला, 'ठीक आहे' आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले.

14) "हे ब्राम्हणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी, धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल, याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती."

15) "एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृध्दी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल."

16) "तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राम्हण राजाला म्हणाला, 'राजन', या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे, डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल."

17) "परंतु महाराजांनी जर असा विचार केला की, 'मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन.' तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहातील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत."

18) "ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा. आपल्या राज्यात जो कोणी गुरे-ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी-बियाणे द्यावे. आपल्या राज्यांत जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे."

19) "मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल. देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचेल. आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल."

20) "तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले. देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजांचा कारभार वाढत राहिला. देश सुख, शांती, अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली; आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली."

21) "जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलाविले आणि म्हटले, "सर्व उत्पात शांत झाला आहे. देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे."

22) "पुरोहिताने राजाला उत्तर दिले, "राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी, आणि प्रतिष्ठित ब्राम्हण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आंमत्रणे पाठवून कळवावे की, मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी."

23) "हे ब्राम्हण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राम्हण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की, 'महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच योग्य वेळ आहे.'"

24) "राजा विजेता हा सूज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सूज्ञ आणि गुणसंपन्न होता."

25) "ब्राम्हणहो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले."

26) "तो पुरोहित बोलला, "महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की, 'अरेरे! मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला?' तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये."

27). "हे ब्राम्हणहो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणा-या लोकांच्यापुढे यज्ञानंतर मनःस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, "महाराज आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याप्रमाणेच अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक् दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यांपैकी दुष्कृत्ये करणा-या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या; परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे."

28) "आणि ब्राम्हणहो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत. बक-यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयूपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरविण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते, त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही, की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले; ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही; ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले; ज्याला जे योग्य वाटले नाही त्याने ते काम केले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला."

29) "जर तुम्हांला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा; अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हांला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो, तो धर्म हीन धर्म आहे."

30) कूटदन्ताने भगवान बुद्धांना प्रश्न केला, "गौतमा! जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय?"

31) "होय, ब्राम्हणा आहे."

32) "असा तो यज्ञ कोणता?"

33) "तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने पुढील गोष्टींपासून दूर राहतो: जीवहिंसा, चोरी, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक मद्याचे सेवन, यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेशग्रहण या सर्वांहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे."

34) गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राम्हण तथागतांना म्हणाला, "श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत."
-----------------------
*(२)*

1) उज्जय नावाचा ब्राम्हण तथागतांना म्हणाला.

2) "गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय?"

3) "नाही. ब्राम्हणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राम्हणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बक-या आणि मेंढरांची कत्तल करतात, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञांत हिंसा घडते ते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत."

"असे का ?"

4) "ब्राम्हणा! कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात."

5) "परंतु हे ब्राम्हणा, ज्या यज्ञात गाईंची हत्या होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ, *प्राचीनकाळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंबपरिवाराच्या हितासाठी केलेला त्याग."*

6) "असे का?"
"कारण हे ब्राम्हणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात."
-----------------------
*(३)*

1) उदायन ब्राम्हणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले.

2) तो म्हणाला, "श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय?" बुद्धांनी उज्जयाला जसे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले.

3) बुद्ध म्हणाले, "ऋतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील या जगातील अज्ञानपटल नाहीसे झालेले आहे असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. जे काळाच्या व येण्या-जाण्याच्या पलीकडे गेले आहेत, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदाहरणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म