5. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
V (पाच)- बुद्धांची धम्मावरील प्रवचने
SECTION FIVE-- Sermons on Dhamma
*************************
5. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे
Not Food But Evil Actions That Matter
***********************

1) आमगंध नावाचा एक ब्राम्हण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहात असे.

2) तो आणि त्याचे शिष्य मत्स्य आणि मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत.

3) एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे अनुयायी बनले.

4) त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्यासंबंधी फारसा उत्साह दाखविला नाही.

5) तथागत मत्स्य आणि मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे-खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहात होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला.

6) "जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे, ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते नीतीमान असून आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत."

7) "परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदुळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. उत्तम प्रकारे शिजवून तयार केलेले पक्ष्याचे मांस व तांदूळ (भात) खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येणार नाही असे तुम्ही म्हणता."

8). "मी तुम्हाला विचारतो ह्याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय?"

9) तथागतांनी उत्तर दिले, "जीवहिंसा करणे, ताडन, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे."

10) "या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधूर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात. ज्याची वर्तणूक समजायला व अनुकरणास कठीण असते, ते म्हणजे आमंगध; मांससेवनाने आमगंधाचा दोष लागत नाही."

11) "या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात, आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषांने युक्त होत. मांससेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही."

12) "राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत, यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांसाशनाने नव्हे."

13) "ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांससेवनाने आमगंध दोष लागत नाही."

14) "जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंधदोषयुक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष जडत नाही."

15) "जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर वार करतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. मांसाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही."

16) "मत्स्यमांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजिन परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ, यांपैकी कशानेही, सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही."

17) "ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःखनिरोध केला आहे तो सूज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो, त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही."

18) "आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो; मत्स्यमांसाच्या सेवनाने नव्हे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म