5. समता आणि समान व्यवहाराची जाण व संवेदना

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग दुसरा - तथागतांची मानवता
Part II- His Humanity
*************************
5. समता आणि समान व्यवहाराची जाण व संवेदना
His Sense of Equality and Equal Treatment
*************************

1) तथागतांनी भिक्खूसंघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वतःही स्वीकार केला होता व ते स्वतःलाही बंधनकारक मानले होते.

2) आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत स्वतःस सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम-विमुक्ति हक्काने उपभोगिल्या नाहीत.

3) भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नाशन करतात हा भिक्खुवर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले.

4) भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले.

5) भिक्खूपाशी फक्त तीनच चीवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाने तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले.

6) एकदा भगवान बुद्ध शाक्यदेशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहात होते त्या वेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्रजोड़ी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली.

7) तथागतांनी तिला सांगितले, "प्रजापती, ती संघाला अर्पण कर."

8). तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले.

9) नंतर आनंदाने आग्रह केला. "भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती." पण वस्त्रे संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही.

10) प्रारंभी भिक्खुसंघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिन्ध्यांतूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता.

11) एकदा जीवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चीवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. जेव्हा तथागतांनी त्या चीवराचा स्वीकार केला, तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली.
 

*******************
(आठवा खंड, भाग दुसरा, समाप्त.)
*******************


*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म