6. देहप्रक्षालन पुरेसे नाही

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
V (पाच)- बुद्धांची धम्मावरील प्रवचने
SECTION FIVE-- Sermons on Dhamma
*************************
6. देहप्रक्षालन पुरेसे नाही
Not Enough Is Outward Washing
***********************

1) एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहात होते. संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहात होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता.

2) एकदा महास्थविर आनंद सकाळच्या प्रहरी चीवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चीवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळविलेली भिक्षा खाल्ल्यावर ते भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले,

3) "भगवान! ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राम्हण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मांत तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. तथागतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राम्हणाची भेट घेतली तर बरे होईल."

4) भगवन्तांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली.

5) दुसऱ्या दिवशी सकाळी तथागत चीवर चढवून व एक चीवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राम्हणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले.

6) संडगाख ब्राह्मण तथागतांजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला.

7) तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, "ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का ?'

8). "श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे."

9) "मग, हे ब्राम्हणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस?"

10) "गौतमा, हे व्रत अशासाठी आहे: दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे."

11) भगवान म्हणाले,

12) "धम्म हे एक जलाशय आहे. ते स्वच्छ व निर्मल आहे."

13) "जे या जलाशयात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात."

14) यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला, "वा:! खूप छान, श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म