6. अंतिम संस्कार

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
6. अंतिम संस्कार
The Last Rites
*************************

1) कुशिनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, "तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची?"

2) आनंद म्हणाला, "लोक सम्राटांची (King of Kings) जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी."

3) "सम्राटांची उत्तरक्रिया कशी केली जाते?"

4) आनंदाने उत्तर दिले, "महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून, त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते."

5) मल्ल म्हणाले, "तसेच आपण करु."

6) मग मल्ल बोलले, "तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे. उद्या ते करु या."

7) नंतर कुशिनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकाला आज्ञा केली, "तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलावून घ्या!"

8). गाथापठन, गायन, नृत्य, पुष्पमाला, सुगंध, वस्त्रांची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादींनी तथागतांच्या देहाला मानसन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा दिवसही गेला.

9) सातव्या दिवशी कुशिनाराच्या मल्लांनी विचार केला, "आज तथागतांचा देह हालवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करु या."

10) नंतर मल्लांच्या आठ प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली.

11) नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे (to the Shrine of the Mallas) नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले.

12) काही काळानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली.
(After some time the mortal remains of the Blessed One were reduced to ashes.)

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म