6. नव्या परिस्थितीतील समस्या

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
Book I, Part II - Renunciation Forever
*********************
6. नव्या परिस्थितीतील समस्या
The Problem in a New Perspective
*************************

 
1) कोलीय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्राजकांनी जी बातमी आणली त्याने गौतम फार अस्वस्थ झाला.

2) एकटेच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करु लागला. आणि आपली परिव्रज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला.

3) त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वतःलाच विचारले.

4) युद्धाला त्याचा विरोध होता. त्याचा युद्धाला विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. "आता ज्याअर्थी युद्ध संपले आहे, त्याअर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय?"

5) खोल विचार केल्यावर तो प्रश्न सुटला नाही असेच त्याला वाटले.

6) "युद्ध-समस्या ही मुळात कलह समस्या (problem of conflict) आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे."

7) "हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे; तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंबात, माता-पुत्रात, पिता-पुत्रात, भावा-बहिणीत आणि सहकाऱ्यांत देखील चालू आहे."

8 ) "राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो; परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरुपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय."

9) "युद्धामुळे मी घर सोडले, हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरीही मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रुप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मी शोधून काढले पाहिजे."

10 ) "जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल?"

11) "त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे शक्य आहे काय?"

12) प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.

*************************
(प्रथम खंड, भाग दुसरा समाप्त )

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
१. भृगुऋषींच्या आश्रमात
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म