1. त्यांचे कूळ (His Kula)
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~ लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
1) त्यांचे कूळ
(His Kula)
*********************
1) ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते.
2) सबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यांत विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती.
3) राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत.
4) ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत --- कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मोर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग.
5) ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यांवर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना 'संघ' किंवा 'गणराज्य' असे म्हणत असत.
6) कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपध्दतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती ते समजत नाही.
7) तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते.
8) अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला 'राजा' अशी संज्ञा होती.
9) सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुध्दोदनाची होती.
10) शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांंतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले.
11) कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते.
12) तत्कालीन राज्यांत कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिध्दार्थ गौतमाचे समकालीन होते.
*********************
क्रमशः -
"बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: २. त्यांचे पूर्वज
खूप छान सर
ReplyDelete